कामगार संघर्ष संकल्प अभियान – कोरोनाने मरण नामंजूर! बेरोजगारी-भुकेने मरण नामंजूर!

एकीकडे कामगार कोरोना आणि मृत्यूचा धोका पत्करत आहेत. दुसरीकडे घोर कामगार-विरोधी मोदी सरकारने कुठलीही पूर्वतयारी न करता जे लॉकडाऊन देशावर लादले त्यात शेकडो लोकांचे जीव गेले. कोट्यवधी कामगारांचे पगार मालकांनी लॉकडाऊन काळात दिलेच नाहीत! स्वच्छता, बससेवा, रेल्वे सारख्या कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा, पीपीई कीट सुद्धा दिल्या गेल्या नाहीत! लोकप्रतिनिधींनी तर जनतेला वाऱ्यावरच सोडून दिले! महामारीच्या काळातही वस्त्या-झोपडपट्य़ांमधल्या स्वच्छतेच्या सुविधा सुधारल्या गेल्या नाहीत! जे प्रवासी कामगार घरी परत जाऊ इच्छित होते त्यांच्यासाठी कोणतीच व्यवस्था केली गेली नाही. परिणामी श्रमिक ट्रेनमध्ये कमीत कमी ८० कामगारांचा आणि त्यांच्या मुलाबाळांचा मृत्यू झाला आणि आता पुन्हा एकदा कुठलीही पूर्वतयारी न करताच लॉकडाऊन उघडण्याच्या नावावर आपल्याला कारखान्यांच्या कामांमध्ये जुंपले जात आहे, जेणेकरून दोन महिने ठप्प पडलेली भांडवलदारांची नफ्याची यंत्रणा पुन्हा सुरु होईल. ह्यामुळे देशभरातल्या अनेक कारखान्यांमध्ये कामगार बांधवांना कोरोनाची लागण झालेली आहे, कामगार वस्त्यांतही कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे, आणि तिथेही कामगारांचे मृत्यू होत आहेत, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर हि आकडेवारी लपवली जात आहे.